२५ सप्टेंबरपर्यंत निवडणूक पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश
उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीबाबत सुरू असलेल्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचा निर्णय दिला आहे. महापौर आणि मनपा आयुक्तांनी निवडणूक प्रक्रियेबाबत जारी केलेले पत्र न्यायालयाने रद्द केले असून, पुढील १५ दिवसांत सर्व प्रक्रिया पूर्ण करून २५ सप्टेंबरपर्यंत स्वीकृत नगरसेवकांची निवडणूक घेण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. या निर्णयामुळे भाजपला मोठा दिलासा मिळाला असून शहर भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
न्यायालयाच्या या आदेशानंतर उल्हासनगर भाजपचे शहराध्यक्ष राजेश वधारिया यांच्यासह पक्षाच्या इतर पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत एकमेकांना मिठाई भरवून जल्लोष साजरा केला. प्रशासनाने निवडणूक प्रक्रिया स्थगित केली असतानाही भाजपने आपल्या सहा उमेदवारांचे आणि चार अपक्ष उमेदवारांचे अर्ज दाखल केले होते, ज्यामुळे भाजप आणि मनपा प्रशासनात मोठा वाद निर्माण झाला होता. न्यायालयाचा हा निर्णय म्हणजे लोकशाही प्रक्रियेचा आणि पक्षाच्या भूमिकेचा विजय असल्याची प्रतिक्रिया भाजप पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
उच्च न्यायालयाच्या या धक्क्यानंतर आता २५ सप्टेंबरपर्यंत ही निवडणूक प्रक्रिया वेळेत पूर्ण होणार की महापौर आणि मनपा आयुक्त यावर काय नवी रणनीती आखणार, याकडे संपूर्ण उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.